Translate

Thursday, 11 November 2021

► मुंबई दिघी सागरी प्रवास पावणेतीन तासात ►Mumbai - Dighi (Shrivardhan) sea voyage in just 2 hours 45 minutes.

 मुंबई दिघी सागरी प्रवास पावणेतीन तासात.

Mumbai Dighi sea voyage in just 2 hours 45 minutes.

२० गाड्यांसह २६० पर्यटक वहन क्षमतेची अत्याधुनिक बोटसेवा सज्ज.


गेटवे ऑफ इंडिया मुंबई ते मांडवा (अलिबाग) कॅटमरान बोट सेवा आणि भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा रो-रो बोट सेवा सुरु झाल्यानंतर आता रायगडमध्ये येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे मुंबई ते दिघी या सागरी मार्गावर अत्याधुनिक हायस्पीड बोट सेवा येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरु होत आहे.

 २० चारचाकी गाड्या आणि २६० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी अत्यंतगतीमान अशी ही अत्याधूनीक बोट मुंबई ते दिघी हे सागरी अंतर केवळ पावणे तीन तासात पार करणार आहे. मुंबई ते दिघा या सागरी मार्गावरील काशीद, मुरुड-जंजिरा, दिवेआगर , श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांना या अत्यंत आल्हाददायक सागरी प्रवासाचा आनंद देखील घेता येणार आहे. अत्याधूनीक हाय स्पीड बोट सुविधेमुळे पर्यटकांना या बोटीतून आपल्या स्वतः च्या कारसह थेट कोकणात पर्यटनासाठी पोहोचता येऊ शकणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आणि सद्यस्थितीतील त्यावरील प्रचंड खड्डे या कारणास्तव स्वतःची कार घेऊन कोकणात येण्यास पर्यटकांची मानसिकता नसते. त्याचाअत्यंत विपरित परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. खड्डेमय महामार्गाचा त्रास आणि त्या निमीत्ताने प्रवासात येणारा ताण दूर करून कोकणच्या निसर्गसौंदर्याचा आनंद पर्यटकांना सागरी प्रवासातून घेता यावा अशा पर्यटनाच्या अभिनव संकल्पनेतून मुंबई ते दिघी हायस्पीड बोटीची संकल्पना पुढे आली आहे. पर्यटन व्यवसायामधील संधींचा वेध घेऊन, तसेच अलिबाग मुरुड तालुक्यांतील नागरिकांना मुंबईचा प्रवास वेगाने सुलभतेने व्हावा या हेतूने आमदार जयंत पाटील यांनी गेटवे ऑफ इंडिया मुंबई ते मांडवा (अलिबाग) या सागरी मार्गावर खासगीकरणातून अत्याधुनिक कॅटमरान बोट सेवा उपलब्ध करुन दिल्यानंतर पर्यटक येण्याचा ओघ वाढल्याने तसेच तो कायम टिकून राहील्याने अलिबाग मुरुड तालुक्यांतील पर्यटन व्यवसायाला गेल्या १० ते १५ वर्षांत मोठी उभारी मिळाली आहे. त्यानंतरच्या टप्प्यात मालदार आणि अजिंठा बोट सेवा खासगीकरणातून सुरु झाली. आणि तिसऱ्या टप्प्यात भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा रो-रो बोट सेवा सुरु झाल्यानंतर आपल्या स्वतः च्या कारसह पर्यटक अलिबाग मध्ये पोहोचू शकले आणि येथील पर्यटनाचे स्वरूपच बदलून गेले. अशाच पद्धतीने आता मुंबई ते दिघा हायस्पीड बोट सेवा येत्या डिसेंबर महीन्यात सुरू झाल्यानंतर काशीद ,मुरुड जंजिरा, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर येथील पर्यटन उद्योगाला खूप मोठी चालना मिळणार आहे. या परिसरातील पर्यटन उद्योग प्रचंड वेगाने विकसित होऊ शकणार आहे.

 दरम्यान मुंबई ते दिघी हायस्पीड बोट सेवा समृद्ध कोकण चळवळीचे आधारस्तंभ आणि परदेशात याच क्षेत्रात कार्यरत कोकणचे सुपुत्र गौतम प्रधान हे सुरू करत आहेत. त्यांच्या या उद्योगामुळे आणि उपक्रमामुळे कोकण पर्यटन विकासाला खूप मोठी चालना मिळणार असल्याची माहिती समृद्ध कोकण संस्थेचे प्रमुख संजय यादवराव यांनी दिली आहे. जगभरातील देशातील कोकणी उद्योजकांनी कोकणात अशा स्वरूपाचे विविध उपक्रम भविष्यात विकसित करावेत याकरिता ग्लोबल कोकण संस्थेचे कायमच सहकार्य राहील असेही यादवराव यांनी पूढे सांगीतले.

 Courtesy: Pudhari (Raigad Edition) अलिबाग: जयंत धुळप


Share this news